शिवसेना पक्ष- माहिती

शिवसेना… शिवाजीची सेना १९ जून १९६६ रोजी शिवसेनेचा जन्म झाला. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे प्रखर भक्‍त होते. ‘वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोधचिन्ह ‘वाघ’ असावं असं बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचे सार व्यक्त होणार्‍या बोधचिन्हाला खुद्द बाळासाहेबांनीच साकारले. शिवसेना हे नाव बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचवले होते. महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेले, रस्ते तुंबले, गल्ल्या भरल्या होत्या. महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेवून दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. चैतन्यमय आणि संघर्षशील असे शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस होते. पहिली सभा दणक्यात झाली. त्यानंतर मराठी तरुणांचे तांडे शिवसेनेकडे वळू लागले. ‘मार्मिक’वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा, स्थानिक क्रीडा संस्था अन्‌ गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ‘नेटवर्किंग’ जोरात सुरू झालं होतं. मराठी माणसांचं हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. बाळासाहेब आणि शिवसेना म्हणजे राजकीय आविष्कार… हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचे नेतृत्वकौशल्य, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा करिष्मा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास… हीच आपली शिवसेना…एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरुण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. असे असतानाही मुंबईत मराठी माणूस अपमानित जिणं जगत होता. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून अधिक इतकं झालं होतं. हा अमराठी टक्का सरकारी नोकर्‍यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन काँग्रेस पुढार्‍यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पर्वा नव्हती. या नेतेमंडळींचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर ‘मार्मिक’चं कॅम्पेन तुफान होतं. बाळासाहेबांचे दौरे सुरू होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर वाढतच होता. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं. मराठी माणसाला मन्वंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेने चाललं होतं की, मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतं किंबहुना ती काळाची गरज होती. महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे वातावरण केवळ व्यंगचित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी संघटित प्रयत्न करायला हवेत, असा विचार बाळासाहेबांनी केला. हर हर महादेवची गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा, या हेतूनेच प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव सुचवले होते. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा आहे, पण मराठी माणूस गरीब आहे, ही परिस्थिती जाणून ती बदलण्यासाठी हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले. मराठी माणूस महाराष्ट्रात, प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे, हे बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आणून दिले आणि मराठी माणसाला संघटित केले. शिवसेनेचा पहिला मेळावा १९६६ साली शिवतीर्थावर झाला, तेव्हापासून आजपर्यंत मराठी माणसांचे शिवसेनेशी जुळलेले नाते आजही कायम आहे. हिंदुहृदयसम्राट श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुढे चालवीत आहेत, तर युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे तरुणांचे संघटन करीत आहेत.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
मा. श्री. बाळासाहेब ठाकरे

समाजातील अनिष्ठ, जाचक परंपरां विरोधात लोकप्रबोधनाचा वसा घेतलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरी बाळ ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्या काळात सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून मनावर कोरली जात असलेली प्रखर राष्ट्रभक्ती, घरातच होत असलेले प्रबोधनकारांचे संस्कार, आणि पुढे घडलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांतून बाळ ठाकरे यांची वैचारिक दिशा स्पष्ट होत बाळासाहेब ठाकरे नामक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आले. १९६० मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमान पत्रातील व्यंग चित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वतःचे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, जे महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे प्रभावशाली माध्यम ठरले. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान चेतावण्याचे कार्य हाती घेतले. मराठी माणसाच्या होणाऱ्या गळचेपी विरोधातील हा लढा संघटीत स्वरुपात अधिक तीव्र करीत मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचार विनिमयांती बाळासाहेबांनी घेतला आणि १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना अखंड महाराष्ट्र ‘शिवसेना प्रमुख” म्हणून ओळखू लागले. मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन व भेदक वक्तृत्व ही बाळासाहेबांची खास शैली आणि म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी विशेष ओळख मिळाली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात निर्विवाद नेते ठरले. दोन रुपयांत गरीबांना झुणकाभाकर देणे हे त्यांचे स्वप्न युतीचे सरकार राज्यात आल्यावर प्रत्यक्षात आले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, झोपडीधारकांना मोफत घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला. राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब व्यक्तीगत आयुष्यात मात्र, खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली. तमाम हिंदूकरिता आदरणीय असणारे, मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदूत्वाच्या प्रसारासाठी आपल्या लेखणीची आणि प्रखर वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचे जनसामान्यांच्या हृदयातील स्थान अढळ आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
मा. ना. श्री. उद्धवसाहेब ठाकरे

प्रखर हिंदुत्वाचा झंजावात आणि मराठी मनाचा मानबिंदू असणाऱ्या शिवसेनेचे खंबीर नेतृत्व म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे पेलत राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेचा भगवा तितक्याच डौलाने फडकवत ठेवण्याचे कार्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे समर्थपणे पार पाडत आहेत. सत्ताधीशांच्या लोक विरोधी कृत्यावर आपल्या शैलीत टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती बाळगताना लोकहितकारी कृत्य, निर्णयांची प्रसंगी प्रशंसा करीत राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात आपले विशेष स्थान पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे बाळगून आहेत. फोटोग्राफी या कलेत विशेष नैपुण्य असणारे उद्धवसाहेब आपली हि कला छंद म्हणून नेहमीच जोपासत आले आहेत. हिंदुत्व आणि राष्ट्र हितासाठी सर्वस्व झोकून दिलेले आणि जनहित हेच शिवसेनेसाठी आद्य कर्तव्य असल्याचे उघडपणे बजावून सांगणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तमाम शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

युवासेना प्रमुख शिवसेना नेते
मा. ना. श्री. आदित्यसाहेब ठाकरे

शिवसेना प्रणित युवकांची संघटना असणाऱ्या युवासेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेतृत्व. घरातच नेतृत्वाचे बाळकडू घेतलेले आदित्य ठाकरे महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या नेतृत्व शैलीची छाप पाडत पुढे राजकारणात आपले नेतृत्व गुण सिद्ध करीत आज युवकांचे प्रश्न ज्वलंतपने मांडत तरुणांना आपला हक्क मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावत आहेत. विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांवर आपल्या विशेष कार्यशैलीतून युवासेना प्रणित संघटनेचे प्रतिनिधी मंडळाची सत्ता स्थापित करून शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बद्दल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी शिवसैनिकांच्या आग्रहाने नियुक्ती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपले विशेष योगदान देणारे आदित्य ठाकरे तंत्रज्ञ विकसित शिक्षण पद्धतींचा अंगीकार करण्यावर आपला विशेष भर असल्याचे दर्शवितात. शैक्षणिक सुधारणां सोबतच तरुणांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.

satta king gali